औरंगाबाद – औरंगाबादमध्ये दिल्ली गेट आणि रंगिन गेट पाहिले. दिल्लीतही एक दिल्लीगेट आहे, मात्र तिथे रंगिन गेट नाही तर एक रंगिन पंतप्रधान राहात असल्याचे सांगत कन्हैय्याकुमार यांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली. ‘संविधान बचाओ देश बचाओ’ मोहिमेंतर्गत औरंगाबादमध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी संसद अध्यक्ष आणि एआयएसएफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कन्हैय्याकुमार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्हैय्याकुमार यांनी संघ आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला, त्यासोबतच पंतप्रधानांच्या सुट आणि इतिहासाच्या ज्ञानावरुन त्यांच्यावर टीकाही केली.
दिल्लीत रंगिन पंतप्रधान राहातात
दिल्ली येथून औरंगाबादमधील
सभेसाठी आलेल्या कन्हैय्याकुमार यांनी औरंगाबादमधील ५२ दरवाजांचा गौरवपूर्ण उल्लेख
केला. ते म्हणाले, या शहराला ५२ दरवाजे असल्याचे मी ऐकले आहे. त्यातील दोन
दरवाजांची नावे मला फार आवडली. एक दिल्ली दरवाजा आणि दुसरा रंगिन दरवाजा. मी
दिल्लीतून आलो आहे. दिल्लीतही एक दिल्ली गेट आहे. तिथे रंगिन गेट नाही मात्र एक
रंगिन पंतप्रधान राहातात. ते रंगिन का आहेत, तर ते रंगिबेरंगी कपडे घालतात. ते
जिथे जातात तिथे वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. ते जेव्हा पंतप्रधान झाले
होते, तेव्हा त्यांचे एक झुठ आणि एक सूट प्रसिद्ध झाला होता. त्याचे झुठ हे होते
की ‘सबका साथ-सबका विकास’ आणि ‘मोदी-मोदी’ लिहिलेला सूट प्रसिद्ध झाला
होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीवेळी मोदी-मोदी असे
सोन्याच्या धाग्याने लिहिलेला सूट घातला होता. या सूटवर प्रचंड टीका झाली होती.
त्यानंतर या सूटचा लिलाव करण्यात आला होता.










